शिक्षकाने गुण दिले शून्य! चक्क भोपळा!! आणि विद्यार्थी म्हणतोय, ''मला शंभरपैकी शंभर गुण हवेत.''
फरक दोन-पाच गुणांचा असता तर कदाचित काही तरी तडजोड होऊ शकली असती पण शिक्षक तर एकही गुण द्यायला तयार नाही आणि विद्यार्थी तर पैकीच्या पैकी गुणांसाठी हटून बसलेला!
फिजिक्सच्या परिक्षेतला तो प्रश्न होता, ''एखाद्या उंच इमारतीची उंची बॅरोमीटरच्या सहाय्याने कशी काढता येईल?'' आणि विद्यार्थ्याने उत्तरादाखल लिहिले होते, 'एक मोठी दोरी घ्यावी. दोरीच्या एका टोकाला बॅरोमीटर बांधावा. इमारतीच्या गच्चीवरून दोरी खाली सोडावी. बॅरोमीटर जमिनीला टेकला की दोरी पुन्हा वर ओढून घ्यावी. दोरीची लांबी फूटपट्टीने मोजावी. दोरीची जी लांबी भरेल ती इमारतीची उंची समजावी.'
आपापसात वाद मिटेना म्हटल्यावर दोघेजण हेडमास्तरांकडे आले. सारी कहाणी ऐकून हेडमास्तरांनी महत् प्रयसाने आपले हासू दाबले आणि गंभीरपणे ते म्हणाले, ''इमारतीची उंची बॅरोमीटरच्या साहाय्याने अशीही मोजता येईल हे खरेच, पण फिजीक्सच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नाला उत्तर देताना त्यात पदार्थ-विज्ञानात शिकवलेल्या तत्वांचा काहीतरी वापर हवाच. ठीक आहे, मी तुला आणखी एक संधी आणि पाच मिनिटाची सवड देतो. तू विचार करून दुसरे काहीतरी उत्तर सांग. पण त्या उत्तराचा, पदार्थ-विज्ञानाशी मात्र संबंध हवा हं!''
चार मिनिटे झाली तरी विद्यार्थी हाताची घडी घालून तसाच शांतपणे उभा राहिलेला होता. मग हेडमास्तरच त्याला म्हणाले, ''काय झाले? नाही सुचत दुसरा काही मार्ग?''
विद्यार्थी शांतपणे म्हणाला, ''मला एकच काय, पण अनेक मार्ग सुचले आहेत. मी फक्त आधी कोणते उत्तर द्यावे, याचा विचार करतो आहे.''
उत्सुकतेने हेडमास्तर म्हणाले, ''अच्छा, सांग बघू एक तरी!''
विद्यार्थी म्हणाला, ''बॅरोमीटर घेऊन पुन्हा एकदा गच्चीवर जायचे. तेथून तो बॅरोमीटर खाली टाकायचा. बॅरोमीटर जमिनीवर आदळायला जेवढा वेळ लागेल तो वेळ स्टॉप-वॉचच्या सहाय्याने मोजायचा. आता s=((u+v)/2)t या सूत्रानुसार इमारतीची उंची काढता येईल.''
वर्गशिक्षकांकडे वळून हेडमास्तरांनी विचारले, ''आता यावर तुमचे काय म्हणणे आहे?''
उत्तरामध्ये पदार्थ-विज्ञानातील तत्वाचा पुरेपूर सामावेश असल्याने वर्गशिक्षक चडफडत निघून गेले. त्यांच्या मागोमाग तो विद्यार्थीही जायला वळला तेव्हा हेडमास्तरानी त्याला खूण करून थांबवले आणि म्हणाले, ''तू मगाशी म्हणालास आणखीही काही मार्गानी याचे उत्तर तुला सांगला येईल. कळू देत तरी आणखी कोणते मार्ग तुला ठाऊक आहेत ते!''
विद्यार्थी म्हणाला, ''एक मार्ग म्हणजे बॅरोमीटर घेऊन पुन्हा एकदा गच्चीवर जायचे. बॅरोमीटरला दोरी बांधायची. वरच्या गच्चीतून बॅरोमीटर खाली सोडायचे. ते जमिनीला जेमतेम टेकले की त्याला लंबकाप्रमाणे झोका द्यायचा. आता लंबकाचा आंदोलन-काल मोजून त्यावरून इमारतीची उंची काढता येईल''
हेडमास्तर म्हणाले, ''छान. आणखी?''
विद्यार्थी म्हणाला, ''अजूनही अेक मार्ग आहे. लख्ख ऊन पडले असेल तेव्हा बॅरोमीटरच्या सावलीची लांबी मोजाची., तशीच इमारतीच्याही सावलीची लांबी मोजायची. आता बॅरोमीटरची उंची मोजायची. बॅरोमीटरच्या सावलीचे आणि उंचीचे जे गुणोत्तर येईल त्याने इमारतीच्या सावलीला गुणले की इमारतीची उंची कळेल''.
हेड मास्तरांना पुनः प्रश्न विचारायची संधी न देता तोच पुढे म्हणाला, ''आणखीही एका वेगळ्या प्रकारे आणि अगदी साध्या पद्धतीने याच बॅरोमीटरच्या साहाय्याने अगदी अल्पशिक्षितालाही इमारतीची उंची काढता येईल. जिन्याच्या पायरीशी बॅरोमीटर उभे करून ठेवायचे. आणि त्याच्या उंचीची पेन्सिलने खूण करायची. त्या खूणेवर पुन्हा बॅरोमीटर उभे करायचे आणि दुसरी खूण करायची. असे करीत करीत इमारतीच्या सर्व पायया चढायला सुरुवात करायची. बॅरोमीटरच्या एकूण जितक्या खुणा होतील, त्या खुणांना बॅरोमीटरच्या उंचीने गुणले की येणारा गुणाकार इमारतीच्या उंची एवढा असेल.''
''आहे खरा अगदी अडाण्यालाही वापरता येईल असा मार्ग!'' हेडमास्तरांनी मनापासून दाद देत म्हटले. तशी तो म्हणाला आता सांगणार आहे तो उपाय पदार्थ-विज्ञानापेक्षा व्यवहारावर जास्त आधारित आहे. बॅरामिटर यायचा; तळमजल्यावरील इमारतीच्या सुरक्षा अधिकार््याच्या केबिनच्या दारावर टकटक करायचे; त्याने दार उघडले की त्याला म्हणायचे, ''साहेब, माझ्याकडे एक मौल्यवान बॅरोमीटर आहे. जर तुम्ही या इमारतीची नेमकी उंची सांगितलीत तर मोबदला म्हणून मी तो बॅरोमीटर तुम्हाला बक्षिस देईन.''
हेडमास्तरांनी आता मात्र त्याच्यासमोर कोपरापासून हात जोडले आणि म्हणाले, ''फार शहाणा आहेस, पळ!''
पण जसा तो मुलगा जायला लागल तसे त्यांनीच त्याला पुन्हा एकदा थांबवले आणि म्हणाले, ''पण काय रे! मला आता एकच सांग, बॅरोमीटरने इमारतीची उंची नेहमी कशी मोजतात, हे तुला खरेच ठाऊक नाही का?''
विद्यार्थी म्हणाला, ''ठाऊक आहे की! पण एका ठराविक साच्याने, साचेबंद पद्धतीनेच विचार करायची जी पध्दत सर्वत्र शिकवली जाते, तिचा मला तिटकारा आहे''!!
मंडळी, 'क्वांटम थेअरी'चा उद्गाता आणि अमेरिकेचा सुप्रसिध्द अणुशास्त्रज्ञ, 'नील बोर' याच्या बालपणीची ही गोष्ट आहे म्हणे! खरे खोटे नील बोरच जाणे!!
गंमत म्हणजे आपल्याकडे सुध्दा अशा उदाहरणांना तोटा नाही. लोकमान्य टिळकांनी शाळेमध्ये असतांना 'संत' हा शब्द 'संत', 'सन्त' आणि 'सन्त' अशा तीन वेगवेगळ्या पध्दतींनी लिहीला होता. नील बोरच्या शिक्षकांप्रमाणेच आपले म्हणणे बरोबर आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनाही शिक्षकांशी भांडायला लागले होते पण अशी बंडखोरी करणारे टिळकच पुढे लोकमान्य म्हणून प्रसिध्दीस आले आणि धोपट मार्गाने 'संत' हा शब्द लिहिणारे त्यांचे शिक्षक मात्र विस्मृतीत गेले.
कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही समस्या आपण एका ठराविक चौकटीतून, एका ठराविक दृष्टीकोनातून, एका ठराविक पध्दतीनेच पाहातो. पण कोणत्याही गोष्टीकडे थोडाशा वेगळ्या पध्दतीने पाहिले तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आपण उपलब्ध साधनसामुग्रीतूनच सोडवू शकतो. गंमत म्हणून मी आणखी अेक मजेदार गोष्ट सांगतो.
अेका व्यापार॒याने अेका सावकाराकडून काही कर्ज घेतले होते. दुर्दैवाने तो ते कर्ज वेळेवर फेडू शकला नाही. कर्जफेडीसाठी सावकार अगदीच नडून बसला. व्यापार॒याने जादा व्याज द्यायची तयारी दाखवूनही सावकार मुदत वाढवून द्यायला राजी होअीना. सावकाराला त्या रकमेची निकड होती, असे मुळीच नव्हते पण त्याच्या मनात पाप होते. व्यापार॒याच्या तरुण, सुंदर मुलीवर याचा डोळा होता. वेळेवर कर्जफेड न केल्याबद्दल, त्या काळच्या नियमाप्रमाणे व्यापार॒याला तुरुंगात जावे लागले असते. या अडचणीचा फायदा घेऊन सावकाराने त्याच्यापुढे प्रस्ताव ठेवला की, जर व्यापार॒याने आपल्या मुलीचा विवाह त्याच्याशी लावून दिला तर तो खटलाही काढून घेईल आणि कर्जही माफ करेल.
व्यापारी मोठा धर्मसंकटात पडला. वयाने किती तरी मोठा असलेल्या या दुष्टबुद्धी सावकाराशी आपल्या लाडक्या लेकीचे लग्न लावून द्यायचे त्याचे मन होईना. पण प्रस्ताव नाकारावा तर तुरुंगाची हवा चाखावी लागणार आणि अेकदा बेअब्रू झाली की पुढेही व्यापारात जम बसायचीही शक्यता उरत नव्हती. काय करावे?
व्यापार॒यापेक्षा खरी संकटात पडली ती त्याची मुलगी! वडिलांसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करावा तर सारा जन्म अेका खत्रुडाबरोबर काढावा लागणार आणि केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करावा तर वडिलांना तुरुंगात खडी फोडावी लागणार! काय करावे?
बाप-लेक दोन्हीही पुरतेच कचाटात सापडले होते.
पण सावकार केवळ पापी आणि लंपटच नव्हता तर धूर्तही होता. 'परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आपण हा निर्णय तिच्यावर लादला,' असे म्हणत सारा जन्म आपला राग राग करायची तिला संधी मिळू नये; 'हा विवाह अेक दैवी अिच्छाच होती,' असे तिला भासावे, यासाठी त्याने अेक युक्ती केली. बाप-लेकीला घेऊन तो अेका बागेत फिरायला गेला. बागेत पायवाटेवर छानशी वाळू पसरलेली होती. त्यात काळ्या आणि पांढर॒या रंगाचे असंख्य खडे अणि गारगोटा विखुरल्या होत्या. अिकडचे तिकडचे बोलत बोलत, खाली वाकून, गुपचूपपणे सावकाराने त्यातले दोन बारीक खडे उचलले आणि दोघांनाही ते न दाखवता, आपल्या जवळील अेका बटव्यात टाकले. मग व्यापायाकडे वळून मानभावीपणे म्हणाला, 'मी या बटव्यात अेक काळा आणि अेक पांढरा असे दोन खडे टाकले आहेत. आता डोळे झाकून हिने बटव्यात हात घालून अेक खडा बाहेर काढावा. जर तो खडा काळा असेल तर मी तुला कर्जही माफ करेन आणि हिने माझ्याशी लग्न करण्याचीही अट घालणार नाही पण जर तिच्या हातात गारगोटीचा पांढरा खडा आला तर मात्र हिला माझ्याशी लग्न करावे लागेल आणि मग अर्थातच मी तुझे कर्जही माफ करेन.''
छाप असो वा काटा, काहीही असले तरी आपले कर्ज माफ होणार याचाही त्या बिचार॒या व्यापार॒याला आनंद घेता येत नव्हता, कारण मुलीच्या हाती पांढरा खडा आला तर.......?
आणि सावकाराचे बोलणे अैकून मुलगी तर पांढरीफटकच पडायच्या बेतात आली. कारण आपण ते खडे गुपचूपपणे अुचलले असे सावकाराला जरी वाटत होते, तरी त्याने दोन्ही पांढरेच खडे अुचलले आहेत, हे तिने पाहिले होते. याचा अर्थ डोळे झाकूनच काय पण डोळे टकटकीत अुघडे ठेऊन जरी बटव्यातून कोणताही खडा काढला तरी तो पांढराच असणार होता! म्हणजे काही झाले तरी सावकाराशी लग्न करावे लागणे अटळच होते.
काय करावे?
ही कहाणी आहे खूपखूप वर्षांपूर्वीची! वयाने, धनाने, मानाने, ज्ञानाने जेष्ठ असलेला माणूस जरी उघडउघड खोटेपणा करीत असला तरी तसे स्पष्ट बोलून दाखवायची त्या काळी पद्धत नव्हती. विशेषतः मुलीने आणि कुलीन घरातल्या स्त्रीने तर असा उध्दटपणा करणे तर शांतम् पापम्! वडिल माणसे पूजनीय असली तरी त्यांच्याबद्दल मुळीच आदर न बाळगणे, ही २१ व्या शतकातील, हल्लीची 'फॅशन' आहे. तेव्हा तशी रीत नव्हती. त्यामुळे ती बिचारी सावकाराची लबाडी डोळाचे पाहूनसुद्धा तो खोटेपणा अुघड करू शकत नव्हती.
काय करावे?
मंडळी, क्षणभर आपण त्या मुलीला विसरून जाऊ. समजा तुम्ही तिच्या जागी असता, तर तुम्ही काय केले असतेत? किंवा समजा तुम्ही तिचे सल्लागार असता तर तिला काय करायचा सल्ला दिला असतात?
आणि अिथे आपली 'विचार करायची क्षमता' स्पष्ट होते. 'विचार करायची क्षमता' म्हणण्यापेक्षा 'विचार करायची पद्धत' स्पष्ट होते, असे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे.
'अेडवर्ड डी बोनो' नावाच्या तत्त्वचिंतकाच्या 'लॅटरल थिंकिंग' नावाच्या पुस्तकातली ही गोष्ट मला परवा दुसर॒याच अेका लेखात वाचायला मिळाली. बोनोने पुढे त्यातून आपल्यापैकी बहुसंख्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचे विष्लेषण केले आहे, (म्हणे!) मी स्वतः अजून 'लॅटरल थिंकिंग' वाचले नाही. पण बोनोच्या विष्लेषणापेक्षा गोष्टीचा शेवट काय झाला हे जाणून यायची तुम्हाला जास्त अुत्सुकता असणार, हे मला पक्के ठाऊक असल्याने बोनोच्या (मी न वाचलेल्या!) विष्लेषणात तुम्हाला न अडकवता, आधी गोष्टीचा शेवट सांगूनच मोकळा होतो कसा!
त्या मुलीने शांतपणे डोळे मिटले. डोळे मिटून शांतपणे बटव्यात हात घातला. बटव्यातील अेक खडा डोळे मिटूनच मुठीत घेतला. डोळे मिटूनच मूठ बाहेर काढली. हात अुताणा करून मूठ अुघडण्याअैवजी, डोळे अुघडण्यापूर्वीच गडबडीने पालथ्या हातानेच मूठ उघडली. कोणी बघण्याआधीच तो चिमुकला खडा वाटेवर पसरलेल्या काळ्या-पांढर॒या अगणित खडात मिसळून गेला. पावसाच्या अेखाद्या थेंबाचे अस्तित्व महासागरात विरून जावे, तसा तो गारेचा छोटा खडा वाळूच्या असंख्य कणांत लुप्त झाला.
तिने शांतपणे डोळे अुघडले. अपराधी चेहरा करून ती पश्चात्तापदग्ध आवाजात म्हणाली, 'किती वेंधळी आहे मी! साधीसुधी गोष्टसुद्धा मला जमत नाही!!' पण झाल्या चुकीचे परिमार्जन अजूनही करता येणे शक्य आहे याचा बहुधा तिला अेकदम बोध झाला असावा. कारण ती लगेचच आश्र्वासक स्वरात म्हणाली, 'तरी फारसे काही बिघडले नाही. बटव्यात अजून दुसरा खडा शिल्लकच आहे. त्याचा रंग पाहिला की हातातून पडलेला खडा काळ्या रंगाचा होता की पांढर॒या रंगाचा, ते स्पष्टच होईल.'
झाल्या चुकीतून तिने पक्का धडा घेतला असावा. या वेळी तिने बिल्कूल वेंधळेपणा केला नाही. खडा हातातून पडणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊन, विजयी मुद्रेने तिने शिल्लक राहिलेला पांढरा खडा बाहेर काढला!
मंडळी, आपल्या दैनंदिन आयुष्यातही असेच पेच आपल्याला क्षणोक्षणी भेडसावत असतात. तसे पाहिले तर त्यांचे अुत्तरही या कहाणी अितकेच साधे सोपे असते. पण का कोण जाणे, आपणा कोणालाच ते कधी सुचत नाही. याचे कारण आपल्यामध्ये विचार करण्याची क्षमता नाही, असे मुळीच नाही. विचार करण्याची आपली पद्धत चुकीची असते, असेही नाही. थोडा विचार केलात तर.... आणि तो विचारही थोडा वेगळ्या पद्धतीने केला तर आपली कोणतीही समस्या सुटू शकते. मात्र त्यासाठी ही जरा वेगळ्या तर॒हेने विचार करण्याची अेक नवी कला शिकावी लागेल. या कलेचे नाव आहे, Think. Differently!
Think. Differently! असे ज्यावेळी मी तुम्हाला म्हणतो आहे त्यावेळी मी हे दोन्ही शब्द स्वतंत्रपणे म्हणतो आहे. Think आणि Differently! वेगळ्या पध्दतीने तर कराच पण त्याहून महत्वाचे म्हणजे प्रथम स्वतः विचार करा. कोणताही विचार मग भले तो चूकीचा का असेना, पण तसा विचार करायला आणि मांडायला मुळीच कचरू नका. यातूनच तुमच्या समस्येवरचा तोडगा निघायचा असतो. पण हाती असलेला इतका साधासोपा उपाय सोडून आपण आपली समस्या कोणी पुढारी सोडवेल का, म्हणून त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहातो.
मंडळी, परिणामतः आपण सारे पुढार॒यांच्या ताटाखालची मांजरे बनलो आहोत. मिंधे झालो आहोत. त्यामुळे या सार॒या पुढार॒यांनी पु. ल. म्हणाले तसे तुर्तास आपली सारी संस्कृती 'गप्प बसा' संस्कृती बनवली आहे. कोणीही, काहीही उलटा प्रश्न किंवा कोणतीही शंका विचारलेली त्यांना खपत नाही. विशेषतः राजकीय पक्षांमध्ये आणि त्यांच्या संबंधीत संघटनांमध्ये तर ही गोष्ट फारच प्रकर्षाने आढळते. कोणताही राजकिय पक्ष याला अपवाद नाही. 'हाय-कमांड' सांगेल ते खरे, ही नवी दळभद्री पध्दत सर्वत्र शिकवली जाते आणि तिचे कटाक्षाने पालन करून घेतले जाते. 'हाय-कमांड'च्या निर्णयावर शंका यायची नाही; 'हाय-कमांड' चुकत असेल असे मनातही आणायचे नाही; असे का?
मी इथे कोणत्याही पक्षाचे वा संघटनेचे नाव घेत काही नाही कारण त्यातून मूळ प्रतिपादन बाजूलाच राहाते आणि केवळ वादावादीच निर्माण होते. पण समजा अेखाद्या संघटनेच्या प्रमुखाचे अमुक अमुक म्हणणे चूकीचे आहे, असे मी म्हटले की तर लगेच ती संघटना म्हणणार, 'त्यांची चूक काढायला तुम्ही असे कोण शहाणे लागून गेलात? त्यांचे म्हणणे समजून यायची तरी पात्रता आहे का तुमची? तेवढा तुमचा अधिकार आहे का? तेवढा तुमचा अभ्यास आहे का? तुमची लायकी ती काय...''. वगैरे वगैरे...
पण या उलट मी जर त्या संघटनेच्या प्रमुखाचे अमुक एक म्हणणे बरोबर आहे, असे म्हणालो तर मात्र हेच संघटनावाले असे कधीच म्हणणार नाहीत, 'अरे वा देसाई, यांचे म्हणणे बरोबर आहे असे प्रशस्तीपत्र तुम्ही कोण देणार? तुम्ही असे कोण शहाणे लागून गेलात? त्यांचे म्हणणे समजून यायची तरी तुमची पात्रता आहे का? तेवढा तुमचा अधिकार तरी आहे का? तेवढा तुमचा अभ्यास तरी आहे का? तुमची लायकी ती काय''.... वगैरे वगैरे...
छान! म्हणजे एखाद्या माणसाला बरोबर म्हणताना, त्याचा अनुयायी होताना मी अभ्यास केला नसला तरी चालतो; माझा त्या विषयातला काही अधिकार नसला तरी चालतो, पण त्या माणसाला विरोध करताना मात्र, माझा त्या विषयाचा अभ्यास असणे आवश्यक धरले जाते, यामध्ये काहीतरी चुकीचे आहे असे तुम्हाला जाणवत नाही का? न्याय लावायचा तर तो दोन्ही बाजूला लावणे आवश्यक आहे अन्यथा याचा अर्थ एवढाच होतो आम्हाला आंधळे अनुयायी हवेत; थोडासुध्दा स्वतंत्रपणे विचार करणारे लोक नकोत!
एक सामर्थ्यवान देश बनविण्यासाठी हे योग्य ठरेल का, याचा विचार करणे खरोखरच आवश्यक आहे. अन्यथा देश बलवान जरूर बनेल; पण ते सारे बळ केवळ खांद्याखालचे असेल. आपल्याला हे अपेक्षित आहे का? Think. विचार करा. पण Differently! स्वतंत्रपणे विचार करा.
चला मंडळी, दुसर॒यांच्या विचारांच्या कुबड्या न घेता, आपल्या समस्यांची अुत्तरे आपणच शोधून काढू. पण त्यासाठी माझ्यावर नव्हे, पण माझ्या या सांगण्यावर विश्र्वास ठेवा, की प्रत्येक समस्येला अुत्तर असतेच. प्रत्येक रावणानंतर राम आणि प्रत्येक कंसानंतर अेक कृष्णही जन्माला येतच असतो. जगात सारेच अशाश्वत असेल तर तुमच्या समस्या तरी चिरंतन कशा राहातील? त्यांनाही शेवट असतोच! आणि तुमच्या समस्येवरचे अुत्तर शोधून काढण्याची क्षमताही तुमच्यातच असते.
दुसर॒या कोणाचे अनुयायी व्हायची आणि दुसर॒या कोणाचा जयजयकार करायची तुम्हाला गरजच नाही. तुम्ही स्वयंभू आहात. तुम्ही स्वयंपूर्णच आहात.
रवीन्द्र देसाई
If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.
Let us make this world a bit better, together!