Tuesday, October 6, 2009

5) परीसस्पर्श

परीसस्पर्श

परीस म्हणून एक खडा असतो (म्हणे!). त्याचा स्पर्श लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचे रूपांतर सोन्यामध्ये होते (हेही म्हणेच बरे कां!). कारण, मी स्वतः काही असा लोखंडाचे सोने बनवणारा परीस पाहिलेला नाही; पण अशा परीसस्पर्शापेक्षा सुद्धा अधिक आश्चर्यकारक आणि मूल्यवान एक स्पर्श मला ठाऊक आहे; तो म्हणजे 'आपुलकीचा स्पर्श'!

आपुलकीचा हा परीसस्पर्श ज्या कामाला कराल ते काम आनंददायीही होऊन जाते. मग मुळात ते भले कितीही कंटाळवाणे आणि किचकट का असेना!

अगदी साधे उदाहरण लक्षांत या. रस्त्यातून आपण जात असतो. गरिबांघरची मुले रस्त्यात गोटा खेळत असतात. धुळीमध्येच खेळत असल्याने त्यांचे हात-पाय पांढरे झालेले असतात. कपडे सगळे मळून गेलेले असतात. डोक्यामध्ये माती गेलेली असते. केस अस्ताव्यस्त झालेले असतात. एखादे पोरगे फारच छान (!) असले तर त्याच्या नाकातून पांढरे-पिवळे कांहीतरी लोंबत असते. आपण त्या पोरांकडे बघतो आणि शहारून, अंग झटकून, त्यांना ओलांडून तसेच घाईघाईने पुढे निघून जातो.

आपण आपल्या घराजवळ येतो, घराचा दरवाजा उघडतो. आणि काय होते? आपण दरवाज्यात आहोत असे बघितल्यावर रस्त्यात खेळणारे एखादे पोर धावत धावत येते आणि ''बाबा'' म्हणून आपल्या पायांना मिठी घालते. ते पोरही रस्त्यातच खेळत असते. त्यामुळे त्याचेही अंग, हात-पाय धुळीने पांढरे झालेले असतात. त्याच्याही डोक्यामध्ये माती गेलेली असते. त्याचेही कपडे मळलेले असतात. जर तुम्ही फारच नशीबवान असलात तर त्याच्याही नाकातून तसाच पांढरा-पिवळा कांहीतरी पदार्थ बाहेर लोंबत असतो.
आता तुम्ही काय करता? तुम्ही शहारून, अंग झटकून थोडेच घरात जाता? छे! उलट तुम्ही त्या पोराला जवळ घेता. खिशातून परीटघडीचा रुमाल काढता. त्याचे तोंड पुसता. त्याचे ते नाक पुसता आणि त्या पोराचा झकासपैकी पापा घेता.

कशामुळे घडते असे?

एक आपुलकीची भावना - एक आपुलकीचा स्पर्श त्या मुलाचा तो सगळा घाणेरडेपणा दूर करतो आणि ते पोरगे तुम्हाला जवळ यावेसे वाटते. केवळ त्याच्यासाठी जगावेसे वाटते. त्याच्यासाठी काम करावेसें वाटते.
हे जे त्या पोराच्या बाबतीत खरे आहे, तेच आपल्या स्वतःच्या कामाबाबतीतही खरे आहे. ''हे काम मला साहेबांनी सांगितले आहे, हे काम माझे नाही'', असें जेव्हा म्हणाल तेव्हा ते काम करण्यामध्ये तुम्हाला गोडीच वाटणार नाही. ते काम तुमच्या डोक्यावरचे एक मोठे ओझे बनून राहील. ते काम नकोसे वाटेल. ते काम करताना कंटाळा येईल. ते काम करताना थकल्यासारखे वाटेल.

या उलट, हे काम माझे स्वतःचे आहे याच्यातून माझा आत्माविष्कार घडणार आहे, मला काय करता येते हे मी याच्यातून दाखवून देणार आहे, असं म्हणालात तर?

तर मघाशी सांगितले तसे आपुलकीच्या त्या परीसस्पर्शाने तुमच्या कामाचे रुपच एकदम बदलून जाईल. तुमच्या कामाचा दर्जा - तुमच्या कामाची क्वालीटी - बदलून जाईल.

असे खरेच करुन बघा. आपले काम स्वतःसाठी अधिक आनंददायी बनविण्यासाठी, आपल्या कामाला अर्थ देण्यासाठी, आपल्या जीवनाला अर्थ देण्यासाठी, आपल्या कामावर प्रेम करा. आपले काम आपले म्हणून करा.

आणि तसे करायला लागलात की वेगळे कांहीही करायला लागत नाही. हे का करायचे आहे? तर ती माझी गरज आहे म्हणून करायचे आहे. कामाची गरज आहे म्हणून नव्हे! यातून माझा आत्माविष्कार व्हायचा आहे. आणि माझा आत्माविष्कार झाला तरच माझे जीवन सफल व्हायचे आहे. अन्यथा बाकी सगळा गोष्टी मिळवून देखील मी प्रत्यक्षांत कांहीच मिळवणार नाही.

बरोबर आहे? पटतय? करणार अशी सुरुवात? उद्यापासून? नव्हे, आत्तापासून?

तर मग आपला हा निश्चय लक्षात ठेवायला सोपे जावे यासाठी, या सायाचा गोषवारा म्हणून मी फक्त एकच शब्द लिहितो .......... आपुलकीचा परीसस्पर्श!
(अरेच्चा, एक म्हणता म्हणता मी दोन शब्द लिहिले. पण तेवढे सांभाळून /या. नाही तरी 'चार शब्द' बोलायला म्हणून उभ्या राहिलेल्या वक्त्याकडून स्वतःला तासभर पिळून यायची आपणा सर्वांना सवय आहेच की!)


रवीन्द्र देसाई

If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.

Let us make this world a bit better, together!

1 comment:

  1. अगदि बरोबर!

    .... करायचेच आहे मग नीट करू या. ठरवले की घडते मग नीट ठरवू या.

    एवढा सुंदर पोस्ट लिहिल्या बदद्ल धण्यवाद!

    ReplyDelete