Friday, October 9, 2009

7) माकडचेष्टा

मंडळी, माकडांची टोळी कधी बधितली आहेत? माकडे जेव्हा निवांत असतात तेव्हा ती काय करतात हे कधी निरखून पाहिले आहेत? प्रत्येक माकड दुसय्राचे केस विंचरून त्यात उवा शोधत राहाते. आणि ऊ सापडली की चक्क खाऊन टाकते. (वाचून तोंडाला पाणी तर नाही ना सुटले?)

पण खरेच, माकडे असे का करतात? मुळात म्हणजे अनेकांना वाटते तशी माकडे शुद्ध शाकाहारी नसतात. ती जरी शिकार करून मांस खात नसली तरी छोट्या अळ्या, किडे, किटक अशा गोष्टी फलाहाराबरोबर तोंडी लावायला त्यांना चालतात. तेवढ्याने त्यांचा उपास बिल्कूल मोडत नाही. त्यामुळे सापडलेली ऊ त्यांनी तोंडात टाकणे, ही बाब फारशी नवलाची नाही.

नवल याचे आहे की इवलीशी ऊ शोधण्यात इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा तेवढ्या वेळात आपण आणखी चार झाडे धुंडाळून त्याच्या कितीतरी पटीने अधिक फळे मिळवू शकू, एवढे सुचण्याइतकी अक्कल त्यांना असूनही ती तशी वागतात. पण त्यापेक्षाही नवल म्हणजे इतका वेळ वाया घालवून ती माकडे स्वतःच्या अंगावरच्या नव्हे तर इतरांच्या अंगावरील उवा शोधत असतात. स्वतः निवांतपणे झोपायचे सोडून ती बापडी, दुसय्राच्या अंगावरच्या उवा मारून त्याला निवांतपणे झोप घेता यावी याची फिकिर करीत स्वतः जागी राहातात.

सबब, 'परोपकारते तुझेच नाव माकड', असे म्हणूया का?

नाही बरे मंडळी, माकडे अशी परोपकारी बिल्कूल नसतात. पण त्यांना एवढे नक्की कळते की शेजाय्राच्या अंगावरच्या उवा मारायचा मी कंटाळा केला तर रात्री त्याच उवा माझ्या अंगावर येऊ शकतील. जर मला माझे अंग ऊ विरहित ठेवायचे असेल तर मला माझ्या शेजाय्राचे अंगही ऊ विरहित ठेवायला हवे, या अत्यंत स्वार्थी विचाराने पण अत्यंत 'कार्यक्षमते'ने ती उवा मारायचे काम करतात.

जे माकडांसारखा क्षुद्र प्राण्यांना समजते ते तुम्हा-आम्हाला का कळू नये?

'भ्रष्टाचार' आणि 'अकार्यक्षमता' नावाच्या आपल्या समाजाच्या शरीरावरील उवा आपल्यालाही अशाच मारायच्या आहेत. त्यासुद्धा दुसय्रांसाठी नव्हे, तर चक्क अगदी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी!!

याचे साधे कारण आपल्या समाजजीवनातील भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता खुद्द आपल्यालाच त्रासदायक ठरत आहेत. आपले कोणाचेच कोणतेच काम धड होत नाही आहे, याचे मूळ भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता यामध्येच आहे. इथल्या महागाईलाही भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमताच खतपाणी घालते आहे. अटकाव केला नाही तर या दोन्ही गोष्टी अशाच चक्रवाढगतीने वाढत राहातील. मग तुमची लाडकी मुले किंवा दूधावरील साय असलेली तुमची लाडकी नातवंडे जेव्हा इथे फुलूफळू बघतील तेव्हा त्यांच्या वाटणीला काय येईल?

त्यांच्या नशीबी होरपळ यायला नको असेल तर भ्रष्टाचाराचा आणि अकार्यक्षमतेचा हा वणवा आपण सर्वांनीच पुरता विझवायला हवा. आणि तेच आपले तातडीचे आणि एकमेव ध्येय असायला हवे.

अनेकांचा असा गैरसमज असतो की मुलाबाळांसाठी खूप पैसा राखून ठेवला की ती सुखाने राहू शकतील. त्यामुळे ते भल्याबुय्रा कोणत्याही मार्गांचा अवलंब करून खूप पैसे मिळवण्याच्या नादी लागतात. असे भल्या-बुय्रा मार्गाचा विधिनिषेध न बाळगता पैसे मिळवावेत की नाही, पैशातून खरे सुख विकत मिळते का, असे आध्यात्मिक वाटणारे प्रश्न एकवेळ बाजूला ठेवले तरी, मुला-नातवंडांच्या वेळेपर्यंत प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता पूर्णपणे रसरतळाला गेली असताना, ते त्या पैशांतून सुख तरी विकत घेऊ शकतील का, एवढा तरी भौतिक विचार आपण करायला नको का?

नुसतेच तिकिटाचे पैसे जमा करून काय फायदा? तुमच्या मुलाबाळांनी जीवनाचा पैलतीर ज्या होडीतून गाठायचा आहे, ती होडी आत्तापासून सुस्थितीत ठेवलीत तरच तुमची मुलेबाळे सुरक्षित आणि सुखाचा प्रवास करू शकणार आहेत. 'भ्रष्टाचार' आणि 'अकार्यक्षमता' नावाची आपल्या हाताने आपणच समाजजीवनाला पाडत असलेले ही भोके आपण बुजवली नाहीत तर काय होईल, ते सांगायला का हवे? बुडत्या माणसाला ढीगभर नोटासुद्धा वाचवू शकतील, असे निदान मला तरी वाटत नाही. आपल्या मुलाबाळांसाठीची ती होडी प्रवासक्षम राखायचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. हा पुढाकार दुसय्रा कोणी नव्हे, आपण स्वतः यायचा आहे. हा तुमच्या-माझ्या मुला-बाळांच्या, आपल्या नातवंडा-पंतवंडांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. इतर कोणी साथ देवोत न देओत, आपण स्वतःपुरते तरी प्रत्येक बाबतीत भ्रष्टाचारापासून चार हात दूर राहाण्याचा आणि कार्यक्षम ठरायचा प्रयत्न करूया!

रवीन्द्र देसाई

If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.

Let us make this world a bit better, together!

1 comment:

  1. ajunhi aaplyala hy goshtincha tras far hot nasava, makadnanna oovancha hoto tasa. kivva , aaplyala tya goshti havya dekhil astil. tya takun dyaychya layakichya hotil tevha aapun manse, makade houn tyana oovan sarkhe kadhun taku.

    ReplyDelete