Saturday, October 3, 2009

3) स्वेच्छेने कैदेत!

स्वेच्छेने कैदेत!

आमच्या सोसायटीतील तिसर्‌या मजल्यावरील त्या आजी-अजोबांकडे पाहिले की मला अगदी गलबलून येते. म्हणजे तशी काही त्यांची दैन्यावस्था आहे, असे नाही हं! अगदी चांगल्या खाऊन-पिऊन सुखी अशा एका सुस्कृंत मध्यमवर्गातले ते जोडपे आहे. मुलगा, सून आणि नातवंडेही त्यांच्या जेवण्या-खाण्याकडे आणि औषधपाण्याकडे मनापासून लक्ष देतात, त्यांचा पुरेसा मान देतात; आणि त्यांचे मनही राखतात. काय हवे-नको ते पाहतात. पण तरीही आजी-आजोबा मनातून खंतावलेले असतात. कारण गेली दोन वर्षे ते दोघेही तिसर्‌या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमधून कधी खाली येऊच शकलेलेच नाहीत. ना देवदर्शनाला, ना कुठे फिरायला, ना नाटक-सिनेमाला, ना कुठे नात्यातल्या लग्ना-मुंजीला, ना कोणत्या सभा-समारंभाला! कसे जाणार? एकवेळ ते तीन मजले उतरणे त्यांना शक्य आहे पण पुन्हा तीन मजले चढून घरी परत जाणार कसे? पहिल्या वेळी मुलाने हौसेने सोसायटीच्या वॉचमनच्या व दोन हमालांच्या मदतीने आजी-आजोबांना खर्चीतून वर आणले होते. पण त्या सार्‌या प्रकरणातील एकूण दगदग, परावलंबन, श्रम आणि खर्च लक्षात आल्यावर तो पहिला प्रयत्नच शेवटचा ठरला. त्या दिवसापासून त्या दोघांचे खाली जाणे आणि पर्यायाने सामाजीकरण जणू बंदच पडले आहे. जणू त्यांना कोणी कैदेत ठेवले आहे - हाऊस ऍरेस्ट!
कहाणी केवळ त्यांची नव्हे, प्रत्येकाची!

पण हे केवळ त्या दोघांचेच दुर्दैव आहे, असे नव्हे. क्वचित एखादा अपवाद वगळता, सर्वच मोठ्या शहरात तीन वा चार मजली इमारतीत वरच्या मजल्यांवर राहाणार्‌या हातपाय धड असलेल्या सर्वच वयोवृध्दांची ही अवस्था आहे. अशा इमारती मूलतः कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांसाठीच बांधलेल्या असल्यामुळे अशा इमारतींना स्वाभाविकपणेच लिफ्टची सोय परवड्याजोगी नसते. पण इमारतीला लिफ्ट नाही म्हणून तेथे राहाणार्‌या माणसांना म्हातारपण येणे थोडेच टळणार आहे? मग अपरीहार्यपणे घरातील जेष्ठ व्यक्तींच्या नशीबी ही अशी अघोषित कैद शेवटपर्यंत येते. आमच्या इमारतीतील त्या आजी-आजोबांची मुले निदान त्यांना विचारत तरी असल्याने त्यांच्या करमणूकीसाठी त्यांनी केबल, डीव्हीडी प्लेअर, साऊंड सिस्टिम, अशी साधनेही त्यांना पुरवली आहेत. पण पिंजरा सोन्याचा असला तरी मोकळ्‌या आकाशातील भरारीचे सुख त्यात थोडेच मिळणार आहे?

हे सारे खरेच अटळ आहे का?

पण म्हातारपण ही जशी अटळ बाब आहे, तशी हातपाय धड असूनही प्रत्येकाच्या बाबतीत ही असली संचारबंदी अपरिहार्य आहे का? निदान मला तरी तसे वाटत नाही. मूलतः कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये एकेका स्वतंत्र इमारतीत असलेल्या मर्यादित फ्लॅटच्या संख्येत आणि सभासदांच्या मोजक्या उत्पन्नामध्ये प्रत्येक इमारतीला स्वतंत्र लिफ्ट बसवणे परवडण्याजोगे नाही, हे मला एकदम मान्य आहे, पण तरीही थोडा वेगळा विचार केला तर निदान धडधाकट वृद्धांबाबत तरी ही समस्या सहजपणे सोडवता येणे शक्य आहे, याची मला खात्री आहे.

दस की लकडी, एक का बोजा!

कोणत्याही एका गृहनिर्माण संस्थेतील सर्वच इमारती एकाच छापाच्या, एकाच मापाच्या आणि एकमेकींना खेटूनच असतात. सहाजिकच त्यांची उंची सारखीच असते. शेजारशेजारच्या दोन इमारतींच्या गच्चीवर अगदी छोटे कामचलावू पूल टाकून अशा सर्व इमारती एकमेकांशी जोडता येतील. आणि मग एका कोणत्या तरी इमारतीला बाहेरील बाजूने 'कॅप्सूल लिफ्ट' बसवून सर्व इमारतीतील गरजू लोक तिचा वापर करू शकतील. एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल इतपत जरी हे पूल अरूंद असले तरी भागू शकेल. अर्थात त्यामुळे त्यांच्या उभारणीचा खर्चही नाममात्र येईल. शिवाय त्यावर कोणताही आवर्ती (रिकरिंग) खर्च येणार नसल्याने पुढे दरमहाच्या खर्चाचाही प्रश्न येणार नाही. सर्व इमारतींना मिळून एकच 'कॅप्सूल लिफ्ट' बसवायची असल्याने तिचाही भांडवली व आवर्ती खर्च सर्व संस्थेवर वाटला जाऊन प्रत्येक सभासदावर पडणारा बोजा सुसह‌यच ठरेल. अशी सुविधा जर आपण पुरवू शकलो तर एका सोसायटीतील सारी वयोवृद्ध माणसे सकाळ-संध्याकाळ वा दुपारीसुद्धा एकत्र येऊ शकतील. गरजेनुसार तळमजल्यावर येऊ शकतील. अन्य वेळी ते सारे जाण्या-येण्यासाठी गच्चीचा वापर करणार असल्याने वाहनांपासून त्यांना धोका उरणार नाही. त्याना मोकळेपणे फिरता येईल, एकमेकांकडे जाता येईल, पाय मोकळे करता येतील, समवयस्कांशी संवाद साधता येईल. त्यांची दुर्लक्षितपणाची व एकाकीपणाची भावना कमी होईल. त्यांचे संध्याछायेतील जीवन अधिक सुसह‌य होईल.

चिंती परा, ते येई घरा!

आणि खरे सांगू का, घरातील वयोवृद्धांसाठी अशी सोय आपल्या सोसायटीत आपण आजच करू या. त्यात आपलाच फायदा आहे. एक तर दिवसेदिवस वाढत्या महागाईत काम जितके लवकर करू तितके ते आपल्याला पैशांच्या दृष्टीने स्वस्तातही पडेल. आणि दुसरे म्हणजे अखेर कधीतरी आपणही म्हातारे होणारच आहोत की! त्यावेळी आपली मुलेबाळे आपली सोय करतील की नाही, आपल्याला बाहेर जाता येईल की नाही, याची चिंता करण्यापेक्षा आपली आपणच स्वतःची अशी भविष्यकालीन सोय लावणे, अधिक चांगले! नाही का?

दुसर्‌यांसाठी खड्डा खणणारा स्वतःच त्या खड्ड्यात पडतो, असे म्हणतात. तसे असेल तर मग दुसर्‌यांसाठी फूलझाडे लावणार्‌यांवर पुष्पवृष्टीच होईल, यात काय नवल?

रवीन्द्र देसाई

दि. ९.१२.२००६

If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.

Let us make this world a bit better, together!

No comments:

Post a Comment